शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन

मा. विवेक सावंत
मा. विवेक सावंतमुख्य समन्वयक
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण.

एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची यादृष्टीने नितांत आवश्यकता आहे. कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.

बदल घडवून आणणारे शेती, औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत. परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली. विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले. संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले. आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत. त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.

वेग, अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. यातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती. हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत. या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषत: विद्यार्थ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या आव्हानानांबद्दल, संधींबद्दल सविस्तर विवेचन ‘परिशिष्ट’मध्ये दिले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये या आव्हानांच्या अनुषंगाने अनेक शिफारशी केल्या आहेत आणि कार्यक्रमही सुचवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम (SARTHAQ भाग १ आणि २), तसेच निपुण भारत अभियान हे दस्तऐवज वाचा. भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने मूल्यशिक्षण, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, विविध विषयांचा परस्परांशी आणि कला व खेळ यांच्याशी समन्वय, बहुवर्ग अध्यापन, वाचताना वाचनाचा वेग आणि आकलन वाढवण्यासाठी घेतलेले उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे अनेक उपक्रम आयोजित करता येतील. ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, तरी परंतु आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपुर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल.

A. एकविसाव्या शतकातील प्रमुख अनिष्टमहाप्रवाह आणि नवी आव्हाने
 
१.

कोविड-१९ विषाणूजन्य व अन्य महासाथींचा चालू व संभाव्य प्रादुर्भाव,

२.

पर्यावरण, नैसर्गिक संसाधने व नैसर्गिक परिसंस्थांचा पराकोटीचा व अपरिवर्तनीय विनाश, चंगळवादाचा अतिरेक, कौटुंबिक व सामाजिक जीवनाचे बाजारीकरण,

३.

जीवजातींचा व जैवविविधतेचा वाढता विनाश व त्यातून मानवजातीच्या अस्तित्वाला धोका,

४.

पृथ्वीवर सर्वत्र वेगाने होत असलेले हवामानातील अनपेक्षित, तीव्र व हानिकारक बदल, कर्बवायूचे वाढते प्रमाण, हवेच्या सरासरी तापमानात वाढ,महासागरांच्या सरासरी तापमानातील वाढ,कमी काळात होणारी अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर, व त्यानंतरची प्रदीर्घ आवर्षणे व दुष्काळ, वाळवंटीकारण, गारपिटी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, जंगलातील अनिर्बंधवणवे, उष्णतेच्या लाटा, ध्रूवीय बर्फ वितळणे, हिमनद्यांचा ऱ्हास, भूस्खलन, टोळधाडी, पिकांवरील किडींचा वाढता प्रादुर्भाव, जमीन, नद्या व समुद्रातील मानवनिर्मित कचऱ्यात बेसुमार वाढ, जमीन, हवा व पाणी यांचे आधुनिक शेती, उद्योगधंदे व जीवनशैलीमुले होणारे जीवघेणे प्रदूषण तसेच उत्पादन व वहातुक, इ. मुळे अप्राप्य उष्णतेचे प्रचंड उत्सर्जन, इ. व या सर्वांमुळे मानवी जीवन व जीवसृष्टीवर होणारे गंभीर दुष्परिणाम,

५.

संपत्तीचे पराकोटीचे केंद्रीकरण, आर्थिक विषमतेची सुनामी,कल्याणकारी राज्याचाविलय, भ्रष्टाचार,

६.

गरीब, वंचित, पीडित, शोषित, कुपोषित, रोगग्रस्त, विस्थापित, बेघर,बेरोजगार, बेदखल व सामाजिकप्रतिष्ठा नाकारली गेलेल्या निराशाग्रस्त जनसंख्येत लक्षणीय वाढ,

७.

स्त्रियांच्या आरोग्य, जीवनमान व विकासाच्या संधींमध्ये घट,

८.

कुपोषित, कुंठीत व अपंग बालकांच्या संख्येतील लक्षणीय वाढ,

९.

सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, लोकशाही, शांतता यांचा जगभर वाढता संकोच,

१०.

व्यक्तिवादाचा अतिरेक,कुटुंबस्वास्थ्याचा ऱ्हास, सामाजिकतेला ग्रहण, मानसिक रुग्णांची वाढती संख्या,

११.

झुंडशाही व हिंसाचारात लक्षणीय वाढ,सार्वजनिक जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनाला, बुद्धिवादाला व विवेकवादाला वाढता विरोध,

१२.

शस्त्रास्त्र स्पर्धा, अमली पदार्थांचा वाढता व्यापार,दहशतवाद, कट्टरतावाद, संकुचित राष्ट्रवाद यांचा अतिरेक,

१३.

विविधतेने नटलेल्या स्थानिक भाषा आणि संस्कृतींच्या अस्तित्वाला वाढता धोका, भाषिक व सांस्कृतिक सपाटीकरण,प्रगत देशांचा वाढता सांस्कृतिक वर्चस्ववाद, इ.


B. एकविसाव्या शतकातील प्रमुख इष्ट महाप्रवाह आणि नव्या संधी
१.

थोड्या असामान्य व्यक्तींच्या असामान्य कृतींपेक्षा बहुसंख्य सामान्य लोकांच्या असामान्य सामुहिक कृतींचा वाढता प्रभाव–
उदाहरणार्थ: विकिपिडीया, ओपन एज्युकेशन रिसोर्सेस, समाजमाध्यमे, ओपनसोर्सिंग, क्राउड सोर्सिंग, सामाजिक सहभागातून कृत्रिम बुद्धिमत्ता विकास,नेते व संघटनेशिवाय जनआंदोलनांचे स्वसंघटन, इ.

२.

आपत्ती निवारण, जीवनमान सुधारणा व पर्यावरण-संजीवक परिवर्तन, इ. क्षेत्रात ग्रीन कॉलर रोजगाराच्या वाढत्या स्थानिक व जागतिक संधी,

३.

‘रिमेकिंग दि वे वी मेक थिंग्ज’ अर्थात रिड्यूस, रियूज, रिफ्यूज, रिस्टोअर, रिसायकल, रिकव्हर, रिजनरेट या तत्वांवर आधारित व ‘सर्क्युलर इकनॉमी’वर आधारित नवी उत्पादन व्यवस्था, उद्योजकता, जीवनशैली,

४.

जैवविविधतेवर आधारित विषमुक्त अन्नपुरवठा करणारी नवी संजीवक शेती वउदरभरण, सुपोषण व आरोग्य रक्षणाचे नवोन्मेष,

५.

न्यू करिअर्स इन रिपेअरिंग दि डॅमेज्ड प्लॅनेट, बिघडलेली पृथ्वी ‘दुरुस्त’ करणारे रोजगार, २०३५ सालापर्यंत प्रगत जगातील २५% रोजगार होणार ग्रीन कॉलर, ग्रीन कॉलर उद्योजकतेला वाढता वाव,

६.

वाढते आयुर्मान,विकसित जगातील वृद्धांचे वाढते प्रमाण, त्यामुळे भारतीय तरुणांना जगभर स्थाईक होऊन तेथे रोजगार व विकासाच्या संधी, त्या मिळविण्यासाठी भारतीयांचे लक्षणीय संख्येने देशांतरण,२०३५ साली स्वदेशाबाहेर स्थाईक होणाऱ्या जगातील एकूण नागरिकांपैकी सर्वाधिक नागरिक मूळचे भारतीय असतील,

७.

जगातल्या मोठ्या लोकसंख्येला ऐहिक सुखाच्या आकांक्षांची परिपूर्ती करणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय जीवनमानाची आस आणि त्याचवेळीती जीवनशैली पर्यावरणाशी संतुलित आणि शाश्वत राखण्याची कधी नव्हती एवढी अपरिहार्यता वनव्या शोधांमुळे तसे प्रत्यक्षात आणण्याच्या शक्यता, भारतीय विद्यार्थ्यांना या नव्या लाईफस्टाईल क्षेत्रात रोजगाराच्या व उद्योजकतेच्या संधी,

८.

डिजिटल क्रांतीतून कर्मशील ज्ञाननिर्मिती, ज्ञानव्यवस्थापन,ज्ञानवितरण व आर्थिक-सामाजिक विकासासाठी त्या ज्ञानाचे व्यापक उपयोजन या महाप्रवाहाचा विस्फोट, ज्ञानाधिष्ठित समाज व ज्ञानकेंद्री अर्थव्यवस्था, स्टार्टअप्स व इतर उद्योग व संशोधन संस्थांच्या पेटंट्सच्या रॉयल्टीतून जगभरातून भारतात नवसंपत्तीचा ओघ निर्माण होण्याच्या शक्यता, नवोन्मेषी ज्ञानकर्मीसाठी, ज्ञान-उद्योजकांसाठी विकेंद्रित रोजगारांच्या व उद्योजकतेच्या भारतात लक्षावधी संधी,

९.

शेती, उद्योग व सेवा क्षेत्रात जडपदार्थ, कच्चा माल, उर्जा, आर्थिक भांडवल यांच्या ऐवजी कर्मशील ज्ञानाला वाढती मागणी, कर्मशील ज्ञान व नवतंत्रज्ञाने यांच्या उपयोजनातून सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील वस्तू (संगणक, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, मोटारी, दुचाकी, घरगुती वापराची वॉशिंग मशीनसारखी साधने, लसी, औषधे, इ.), उत्पादने आणि सेवांच्या किंमतीमध्ये विशेषत: वैज्ञानिक व उपयोजित ज्ञानशाखांमधील कर्मशील ज्ञानाला व नवतंत्रज्ञानाला व त्यांच्या बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या (पेटंट्सच्या) मानधनाला (रॉयल्टीला) मध्यवर्ती स्थान, त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना ‘नवोन्मेषी ज्ञानकर्मी’ / ‘नॉलेज वर्कर’ होण्याच्या तसेच ज्ञानाधारित उद्योजकतेच्या लक्षावधी संधी,

१०.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेगाने विकास व मानवी जीवनाच्या सर्व अंगांना केवळ स्पर्शच नव्हे तर त्यांना खोलवर प्रभावित करणारा विस्तार, कृत्रिम बुद्धिमत्ता माणसांचा शत्रू, वैरी, विरोधक, प्रतिस्पर्धी नसून भागीदार असणार आहे व जे विद्यार्थी स्वत:ची मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची टिकाऊ भागीदारी साधू शकतील त्यांना अधिक यशस्वी करिअर्स करता येतील,

११.

बिग डेटा, मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कम्प्युटर व्हिजन, ब्रेन मॅपिंग, रोबोटिक्स, कोबोटिक्स, नॅनोतंत्रज्ञान, बायोतंत्रज्ञान, हरित उर्जा, सिंथेटिक बायॉलजी, जिनोमिक्स, आयओटी, थ्रीडीप्रिंटींग, ड्रोन्स, इलेक्ट्रिक व चालकविरहित वाहने,ऑगमेन्टेड रिअलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी, क्लाउड कम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सी, इंडस्ट्री ४.०, इंडस्ट्री ५.०, इ. स्मार्ट नवतंत्रज्ञानांचा वेगवान विकास व त्यांचा अफलातून संगम साधून मिर्माण होणारी नवउत्पादने व अभिनवसेवा,नवे रोजगार,नवी गिग इकनॉमी,

१२.

नवे रोबोबहुल असेन्द्रीय जग व बहुविध इम्प्लांटधरी मानवी शरीराचा आविष्कार व मानवी अस्तित्वाचा कल्पनातीत असा नवा आशय (ह्युमनॉईड),

१३.

भारताची न भूतो अशा दारिद्र्यमुक्त व विषमतामुक्त समृद्धीकडे संभाव्य झेप.

या महाप्रवाहांचा,आव्हानांचा आणि संधींचा अनुभव जन्यपरिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. तसे केल्यासच त्यांचे शिक्षण जीवनाभिमुख, भविष्यवेधीव म्हणूनच अर्थपूर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य केवळ सुरक्षितच नव्हे तर उज्ज्वलही होऊ शकेल. पण तसे न केल्यास आपण त्यांना भूतकाळासाठी तयार करू!

हे महाप्रवाह, आव्हाने व संधींच्या संदर्भातील “नवशिक्षणाची उद्दिष्ट्ये काय असायला हवीत हे आपण पाहू.


C. नवशिक्षणाची उद्दिष्ट्ये
१.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात ज्ञान, निर्मिती, सौंदर्यदृष्टी,प्रेम व करुणेचा परिपोष साधणे.

२.

‘आजीवन ज्ञानसाधना’ करण्यासाठी विद्यार्थ्यांचा पिंड घडवणे.त्यांना ‘लर्न-अन्लर्न-रीलर्न’चा रियाझ घडवणे.

३.

कुतूहल, जिज्ञासा, चौकसबुद्धी, वैज्ञानिक दृस्थीकोन,कळीचे प्रश्न उपस्थित करता येण्याची क्षमता, स्वतंत्र विचार व स्वतंत्र अभिव्यक्ती क्षमता,कलात्मक आविष्कार क्षमता,खिलाडू वृतीने अपयश पचविण्याची हिम्मत,साहसी-धाडसीवृत्ती,जोखीम स्वीकारण्याची तयारी, इ. गुणांचा परिपोष व्हावा असे शैक्षणिक वातावरण विकसित करणे.

४.

मृदू कौशल्ये,संवाद-कौशल्य, सहकार्य क्षमता, स्काउट-गाईड सदृश पुढाकार घेण्यची वृत्ती, निरपेक्ष वतत्पर सेवाभाव, इ. विकसित करणारे शैक्षणिक वातावरण विकसित करणे.

५.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून उद्योजकतेचा अनुभवजन्य विकास करणे.

६.

विद्यार्थ्यांना सर्जनशील निर्मिती करायला शिकविताना ती निर्मिती कर्मशील ज्ञानाधिष्ठित कशी होईल, समाजविकासकेंद्री कशी होईल, त्याचवेळी पर्यावरणस्नेही कशी होईल व नवतंत्रविज्ञानस्नेही कशी होईल हे पाहणे.

७.

विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्तेशी तंत्रस्नेही भागीदारी यशस्वी करायाला कसे शिकतील,मात्र तिचे गुलाम होणार नाहीत हे सुनिश्चित करणे.

८.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वात उत्क्रांती व संस्कृतीतून मिळालेल्या निखळ व अंगभूतमानवी क्षमतांचा परिपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थीशुष्क,यंत्रवत किंवा रोबोसदृश होणार नाहीत याची कसोशीने काळजी घेणे. (तसे न केल्यास ते हमखास बेकारच नव्हे तर बेदखलही होतील.)

९.

विद्यार्थ्यांना संवेदनशील, सर्जनशील, विवेकी व सुसंस्कृत माणूस होण्यासाठी स्फूर्ती देणे व प्रयत्नकरणे.(मुलांना अधिक सुसंस्कृत माणसे होण्यास शिकवूया, यंत्रांना अधिक स्मार्ट यंत्रे बनण्यास ‘शिकवू’या आणि मुलांना यंत्रे होण्यापासून वाचवूया!)

१०.

विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या जगातील आव्हाने व संधी यांना आत्मविश्वासाने सामोरे जाणारे सक्षम व्यक्तिमत्व विकसित करणे.

११.

निर्भयता, नम्रता, सत्य, अहिंसा, साधी रहाणी, श्र्मानंद, इंदिये आणि मन यांचे आत्मसंयमन, सर्व नैसर्गिक संसाधनांचा काटकसरीने कमीत कमी वापर करणारी व शक्यतो स्थानिक संसाधानांतून बहुतेक गरजा पूर्ण करणारी जीवनशैली, इ. चा परिपोष करणारे शैक्षणिक वातावरण विकसित करणे.

१२. भारतीय संविधानातील मूल्यांचा आदर व मनापासून अंगिकार करणारे आणि आपली कर्तव्ये व हक्क यांचे मनापसून पालन करणारे व विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीविषयी आस्था असणारे व जगातील विविध संस्कृतींच्या विषयी संवेदनशीलता बाळगणारे सुजाण नागरिकत्व मुलांमध्ये विकसित करणे.

 

 


D. नवशिक्षणाची सुरुवात परिवर्तनशील शिक्षकांपासून

या उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत केवळ सुधारणा (रिफॉर्म) करून चालणार नाही तर त्यात विचारपूर्वक परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) घडवून आणावे लागेल.प्रचलित व्यवस्था काहीशी बंदिस्त व साचेबंद आहे. त्यामुळे त्यातील ठराविक अभ्यासक्रम व त्याच्या ठराविक पद्धतीच्या अध्यापन, अध्ययनव मूल्यमापनातून शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याला मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेतून वर उल्लेखिलेले नवे महाप्रवाह, नवी आव्हाने व नव्यासंधी यांच्या संदर्भात होऊ शकणाऱ्या विद्यार्थी विकासालाही मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेत कोणताही बदल घडवून आणण्यातील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक, पालक, शासन व समाज या सहभाग-धारकांचा उत्साह, सहभाग, पुढाकार व सातत्य, इ.वरही अनेक मर्यादा असतात हे दीर्घकाळ दिसून आले आहे.

वरील उद्दिष्ट्ये कितीही अवघड असली तरीही तशा परिवर्तनासाठी शिक्षक या त्यातल्या त्यात अधिक प्रभावी घटकापासून सुरुवात करता येईल.जिद्दीने प्रयत्न करू शकणाऱ्या शिक्षकांना हुडकून काढून प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विषयनिहाय अपेक्षित असलेली पाठ्यपुस्तकांमधील किमान उद्दिष्ट्ये वरील आव्हाने व संधींचा परिचय होण्यासाठी आधारभूत आहेत.पण पुरेशी मात्र नाहीत.ती किमान उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी योग्य ते अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट गुणवत्तेने केलेच पाहिजे.व्यवस्थेची व समाजाची ती किमान अपेक्षा आहेच.पण नव्या परिवर्तनासाठी त्या पलिकडे जावे लागेल.केवळ ‘विषयांचे शिक्षक’ हे साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी हवेत ‘विद्यार्थ्यांचे शिक्षक’.

त्यामुळे किमान अपेक्षांची उत्तम परिपूर्ती करणाऱ्या पण तेथेच न थांबता त्यापुढे जाऊन आपल्या प्रतिभेने व अतिरिक्त प्रयत्नांनी विशिष्ट शैक्षणिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे उचित होईल.ती परिवर्तनाची उचित सुरुवात ठरेल. अशा शिक्षकांनी वरील महाप्रवाह,आव्हाने व संधी यांचा निरंतर अभ्यास करून अध्यापनात व शालेय उपक्रमात सतत अनुकूल बदल करायला हवेत.


E. नवशिक्षणाची सुरुवात परिवर्तनशील उपक्रमांमधून

अशा परिवर्तनशील शिक्षणाची अर्थात ‘नवशिक्षणा’ची सुरुवात सध्याच्याशालेय पर्यावरणाशी मेळ राखत, त्यातील सर्व सहभाग-धारकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळवून व विरोध टाळून करावी लागेल.योग्य अशा व नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमेतर कृतीशील उपक्रमांमधून, वेळापत्रकेतर वेळात व चाकोरीबाह्य पद्धतीने ती करणे उचित ठरेल.तसे होतकरू व उपक्रमशील शिक्षक या फेलोशिपसाठी पात्र ठरतील. अशा शिक्षकांकरवी परिवर्तनाची सुरुवात करता येईल.

उत्साही, हिकमती, नाउमेद न होता अडचणींचे संधीत रुपांतर करणाऱ्या, विशिष्टज्ञान क्षेत्रे, विद्या किंवा कलांमध्ये तरबेज असलेल्या, विद्यार्थ्यांचा विकास करण्यात मनापासून रस असलेल्या, ‘हटके’ प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या नानाविध उपक्रमांद्वारे हळूहळू हे ‘नवशिक्षण’ मुख्यप्रवाही करण्याचा मार्ग सापडू शकेल. अशा शिक्षकांना आपण ‘बलशाली मार्गशोधक’ किंवा ‘पाथफाइंडर’ किंवा ‘इंस्पायरर फेलोज्’ म्हणूया.

आपल्यला असे शिक्षक शोधून काढावे लागतील. विहित अभ्यासक्रम केंद्री अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या पलिकडे जाऊन सातत्याने परिवर्तनशील कामगिरी केलेल्या शिक्षकांची निवड करावी लागेल.वेळापत्रकापलिकडे जाउन, अभ्यासक्रमापलिकडच्या कल्पक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण करू पाहणाऱ्या व त्यासाठीचा कोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना नवशिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वाव,पाठबळ, मदत,प्रोत्साहन, प्रशिक्षण,मार्गदर्शनव प्रतिष्ठा द्यावी लागेल.

त्यांना नवी आव्हाने व संधींशी सुसंगत अशा त्यांच्या पसंतीच्या व प्राविण्याच्या उपक्रमांच्या आरेखन व अंमलबजावणीसाठी रोख रक्कम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन या स्वरूपातील शिष्यवृत्ती / प्रकल्प-वृत्ती देण्यात येईल. त्या प्रकल्प-वृत्तीस “माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” असे संबोधण्यात येईल.

फेलोशिपसाठी वयोमर्यादा: वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे पूर्णवेळ शिक्षक
फेलोशिप कालावधी: एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४
फेलोशिपसाठी पात्रता: परिशिष्ठमध्ये अंतर्भूत केलेल्या उद्दिष्टांशी सुसंगत, नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे व शैक्षणिक वर्षभर विकसित होत जातील असे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर उपक्रम करत असलेले/ करू इच्छिणारे शिक्षक अर्ज करण्यासाठी पात्र समजण्यात येतील. तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात बदली न होणारे शिक्षकानी अर्ज करावा.
फेलोशिप्सची संख्या: प्रती वर्षी ४०
प्राथमिक शिक्षकांसाठी : २०
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी : २०
अर्जदारांचे कार्यक्षेत्र: महाराष्ट्रातील शाळांत व ज्युनिअर कॉलेजात कार्यरत असलेले शिक्षक
फेलोशिपची रोख रक्कम: निवड झालेल्या प्रत्येक शिक्षकास वार्षिक ६०,०००/- (रुपये साठ हजार फक्त). यातील रक्कम रुपये ४०,०००/- शिक्षकाना प्रत्यक्षात फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास, इत्यादीसाठी देण्यात येईल आणि उर्वरित रुपये २०,०००/- रक्कम ही कार्यशाळा आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनासाठी खर्च करण्यात येईल.
अर्ज प्रक्रिया
१.

इच्छुक शिक्षकांनी दिनांक १२ ऑक्टोबर २०२२ पूर्वी https://apply.sharadpawarfellowship.com संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.

२.

अर्जदारांनी फेलोशिपसाठी आपण स्वत: हाती घेणार असलेल्या “शैक्षणिक परिवर्तन उपक्रमा” विषयी मराठी किंवा इंग्रजी भाषेत पुढील मुद्दयांच्या आधारे सुमारे १००० शब्दांचे टिपण अर्जासोबत जोडणे अपेक्षित आहे.

२.१

उपक्रमाचे शीर्षक

२.२

उपक्रमाची गरज आणि महत्त्व – उपक्रम निवडण्याचे कारण, वेगळेपण आणि उपयुक्तता याबाबतचा तपशील

२.३

उपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का निवडला आहे, त्याचा कोणता फायदा कोणाला होणार आहे, याबाबतचा तपशील.

२.४

उपक्रमाची वैशिष्ट्ये –
अ.  उपक्रमपूर्व स्थिती
आ.  संबंधित व्यक्ती/तज्ज्ञ यांच्याशी चर्चा
इ.  उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या साधनांचा विचार
ई.  उपक्रमांतर्गत कृतींचे टप्पे आणि त्यांचे क्रम (संभाव्य वेळापत्रकासह)
उ.  अपेक्षित उपक्रमोत्तर कृती
ऊ.  उपक्रमाची अंमलबजावणी केल्याबद्दल सादर करावयाचे पुरावे

२.५

उपक्रमाची अपेक्षित फलनिष्पत्ती

३.

आपण प्रस्तावित करीत असलेला उपक्रम आपण पूर्वीपासून राबवत असाल तर त्याचा तपशील छायाचित्रे,चित्रफीत, परखड मूल्यमापन,इ.सह सोबत जोडावा.

४.

विषयनिहाय अभ्यासक्रमातील नेहमीच्या वेळापत्रकात समाविष्ट असलेले अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनविषयक उपक्रम या फेलोशिपमध्ये अपेक्षित नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

 

११ ऑगस्ट २०२२

कार्यशाळा वेळापत्रक घोषणा

११ ऑगस्ट २०२२

१२ ऑगस्ट २०२२ ते १२ ऑक्टोबर २०२२

ऑनलाइन फॉर्म सबमिशन

१३ ऑक्टोबर २०२२ ते ०३ नोव्हेंबर २०२२

अर्जाची छाननी आणि निकालाची तयारी

१३ ऑक्टोबर २०२२ ते ०३ नोव्हेंबर २०२२

११ नोव्हेंबर २०२२

निकालाची घोषणा

११ डिसेंबर २०२२

फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम

११ डिसेंबर २०२२

पाठ्यवृत्तीचा कालखंड - एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४

२१, २२, २३ एप्रिल २०२३

प्रथम कार्यशाळा

२१, २२, २३ एप्रिल २०२३

१५ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३

प्रकल्पाना भेटी

१८,१९,२० नोव्हेंबर २०२३

द्वितीय कार्यशाळा

१८,१९,२० नोव्हेंबर २०२३

२६, २७, २८ एप्रिल २०२४

तृतीय कार्यशाळा व प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

निवड प्रक्रिया:

तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल व पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच शिक्षकांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष/ दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल.मुलाखत शक्यतो इच्छुक शिक्षकांनी अर्जासोबत पाठविलेल्या टिपणावर आधारित असेल.मुलाखतीच्या गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी वरील प्रमाणे ४० शिक्षकांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचीही सहसंमती घेण्यात येईल.

पूर्वतयारी:

एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४ या कालावधीत खालील गोष्टी करण्यात येतील:

निवड झालेल्या फेलोज् चे किमान ३ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर, फेलोने हाती घ्यावायाच्या उपक्रमांचे सादरीकरण व चर्चेअंती निश्चिती,फेलोच्या नियोजित उपक्रमांचे व त्यांच्या मूल्यमापनाचे नियोजन, संसाधनांची जुळवाजुळव, सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड, पालकांची अनुमती, मासिक व अंतिम प्रकल्प-अहवालांची रूपरेषा, इ.

फेलोशिपमधील उपक्रमाचा कालावधी:

एप्रिल २०२३ ते एप्रिल २०२४. त्या कालावधीत फेलोज् नी वर निश्चित केलेले उपक्रम करून त्यांचे मासिक अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मे २०२४ मध्ये फेलोज् नी सविस्तर अहवाल लेखन करून संयोजकांकडे पाठविणे अपेक्षित आहे.

फेलोशिप सांगता शिबीर:

शेवटी एप्रिल २०२४ मध्ये ३ दिवसांचे सांगता शिबीर आयोजित करून त्यात सर्व फेलोज् चे त्यांच्या मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादरीकरण होईल व त्यावर इतर तज्ज्ञांबरोबर चर्चाही होतील. त्यात फेलोशिपनंतर शैक्षणिक परिवर्तनाच्या प्रयत्नांचे सातत्य राखण्याविषयी सूचन होईल. प्रशस्तीपत्रांचे वितरण व फेलोज् नी केलेल्या उपक्रमांचे फेलोशिप पोर्टलवर प्रकाशन करण्यात येईल. पुढे पोर्टलला योग्य ती प्रसिद्धी देऊन राज्यातील विशेषत: विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत ते उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या पोर्टलवर फेलोज् चे ब्लॉग्ज, इतर शिक्षकांचे प्रतिसाद, सूचना, प्रश्नांना उत्तरे, इ. सेवा सुरू करता येतील. उत्तरोत्तर या पोर्टलवर अशा उपक्रमांची महासूची तयार होईल व शैक्षणिक परिवर्तन करू इच्छिणाऱ्या शेकडो शिक्षकांना ती मार्गदर्शक व स्फूर्तीदायक ठरेल.

योगेश कुदळे

क्षेत्र समन्वयक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

ई-मेल आयडी : yashdeepkudale@gmail.com

फोन नं : +91 93707 99791

आगामी कार्यशाळा