शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप

दर पिढीतील तरुण लेखकांनी आपल्या लेखनाद्वारे घडवलेला नवतेचा आविष्कार आजवरच्या मराठी साहित्याला आणि संस्कृतीला समृद्ध करत आला आहे.
साहित्य हे जीवनातली संवेदनशीलता, प्रगल्भता टिकवून ठेवते, वाढवते. तरुण लेखकांचे साहित्य समाजाला नवी दृष्टी, नवी संवेदनशीलता देत असते. मराठीत आधुनिक साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य असे नवनवे जोमदार आविष्कार त्या त्या काळातल्या लेखकांच्या तरुण पिढीने घडवून आणले.
भारतीय समाजात आज तरुणांची संख्या अधिक आहे. पण वर्तमान जीवनातली वाढती स्पर्धात्मकता आणि गुंतागुंतीची व्यवधाने यांमुळे ही तरुण पिढी साहित्यापासून काही प्रमाणात दुरावत आहे. अशा स्थितीत आजच्या तरुण पिढीतल्या लेखकांना प्रोत्साहन देऊन लिहिते ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीने तरुण लेखक/लेखिकांना साहित्यलेखनासाठी प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल अशी,‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ योजना यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे सुरू करत आहोत.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे साहित्यप्रेम सर्वश्रुत आहे. त्यांच्या साहित्यप्रेमाचा वारसा पुढे शरद पवार साहेब यांनीही चालवला. परिवर्तनवादी साहित्यमूल्ये जपणारे लेखक, साहित्यिक उपक्रम आणि चळवळी यांना या नेत्यांनी नेहमीच पाठबळ दिले. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या या दोन्ही नेत्यांचा मराठी साहित्याविषयी असलेला जिव्हाळा लक्षात घेऊन,त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटरने ही साहित्य पाठ्यवृत्ती योजना आखली आहे. शरद पवार साहेब यांच्या नावाने, त्यांच्या ८१व्या वाढदिवशी ही योजना महाराष्ट्राला समर्पित करत आहोत.
‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप’ ही कादंबरी, नाटक, चरित्र, बालसाहित्य अशा साहित्यप्रकारांत लेखन करू इच्छिणाऱ्या, तसेच सामाजिक, सांस्कृतिक किंवा विज्ञान या विषयांवर पुस्तक लिहू इच्छिणाऱ्या युवा लेखक/लेखिकांसाठी आहे. या पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या लेखकांना पुस्तक लिहिण्यासाठी आर्थिक साहाय्य केले जाईल. शिवाय त्यांच्यासाठी उद्बोधन वर्ग आयोजित केले जातील. गरज भासल्यास त्यांना मार्गदर्शकही उपलब्ध करून दिले जातील. पाठ्यवृत्तीप्राप्त लेखकांच्या लेखनातील समस्या दूर होऊन त्यांचे लेखन अधिकाधिक दर्जेदार व्हावे यासाठीचे हे प्रयत्न असतील. अशा तऱ्हेने लिहिलेले पुस्तक निवड समितीच्या पसंतीस उतरल्यानंतर त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठीही साहाय्य केले जाईल. दरवर्षी मराठीतील दहा युवा लेखक/लेखिकांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल.
मराठीत लेखकांना त्यांच्या ग्रंथलेखनासाठी इतक्या मोठ्या संख्येने अशा तऱ्हेची पाठ्यवृत्ती प्रथमच उपलब्ध होत आहे. लेखनाची इच्छा आणि लेखनविषयाची जाण अंगी असूनही तरुण पिढीतले बरेच लेखक प्रतिकूल परिस्थिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव इत्यादी कारणांमुळे साहित्य निर्मिती करू शकत नाहीत. अशा लेखकांसाठी ‘शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप योजना’ म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्राच्या सर्व विभागांतील तसेच विविध सामाजिक स्तरांतील युवा लेखक/लेखिकांनी या पाठ्यवृत्ती योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करत आहोत.
- डॉ. नीतीन रिंढे
- प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
- लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
- तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.
- पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकांना अनुदान. यात प्रवास/निवासी भत्ता आणि पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आंशिक आर्थिक साहाय्य याचाही समावेश असेल.
- लेखन प्रक्रियेतील समस्या दूर करून लेखन कौशल्ये विकसित करण्यासाठी,आवश्यक त्या संशोधनासाठी पाठ्यवृत्ती प्राप्त लेखकाला स्वतंत्र मार्गदर्शक.
- लेखनासंदर्भातले मार्गदर्शन वर्ग आणि मराठीतील यशस्वी समकालीन लेखकांशी खुल्या चर्चांची संवादसत्रे.
- दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा : १५ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी.
- शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (nonfiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
- इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.
शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.
- कादंबरी किंवा दीर्घकथा.
- नाटक
- ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
- कोणत्याही भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
- विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
- बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)
पाठ्यवृत्तीचे स्वरूप :
- निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी पाठ्यवृत्ती रु.५०,०००/-
- पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/-
- पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च
- लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च
- निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य
अ) अर्ज करण्याची पद्धत :
फेलोशिपसाठी इच्छुक युवक-युवतींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने विहीत केलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावी. इच्छुकांनी तपशीलवार परिचय - नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी- व्यवसाय. आवडतेलेखक/आयुष्यावर प्रभाव टाकणारी किमान तीन पुस्तके अथवा लेखक याविषयी किमान २०० शब्दांत माहिती द्यावी. त्यात आणखी एक प्रश्न असेल ज्याचे सविस्तर उत्तर अपेक्षित असेल. प्रश्न : ‘शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृत्ती : ध्यास सर्वोत्तमाचा, शोध युवालेखकांचा’ या फेलोशिपमुळे तुम्ही सध्या लेखन करत असलेल्या कार्यात किंवा नियोजित लेखनकार्यात कशा प्रकारे साहाय्य होईल असे वाटते याचे सविस्तर उत्तर लिहा.
- आपल्या नियोजित लेखनाचा मजकूर पीडीएफ स्वरूपात सोबत जोडावा. खालीलप्रकारे आपण मजकूर जोडू शकता :
- कादंबरी असल्यास किमान २००० शब्दांचे एक प्रकरण; दीर्घ कथा असल्यास किमान एक प्रकरण. तसेच, कादंबरी अथवा दीर्घ कथेचा ५०० शब्दांत आराखडा/प्रारूप जोडावे.
- नाटक असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि सोबत नाटकाचा विषय सुस्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
- ललितेतर साहित्य (नॉन फिक्शन) असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय-आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
- अनुवादित साहित्य असल्यास, मूळ भाषेतील एक प्रकरण आणि त्याचा मराठीत केलेल्या अनुवादाचा मजकूर असे दोन्ही भाग जोडावेत. अनुवादित मजकूर हा किमान २००० शब्दांचा असावा. सोबत, मूळ पुस्तकाचे शीर्षक, लेखक, प्रकाशक, विषय-आशय यांची स्पष्ट माहिती देणारा आराखडा/प्रारूप किमान ५०० शब्दांत जोडावे.
- विज्ञान साहित्य असल्यास, किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय- आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा किमान ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
ब) फेलोशिप कालावधी :
- ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी : १५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
- आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती : १३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
- अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा : १ डिसेंबर २०२५
- फेलोशिप प्रदान सोहळा: १४ डिसेंबर २०२५
- फेलोशिपचा कालावधी हा १४ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२६ असा एका वर्षाचा असेल.
- अभिमुखता कार्यक्रम :निवड झालेल्या फेलोंच्या वेळेचे नियोजन बघून अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम) दिनांक १३ डिसेंबर किंवा १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडेल.
- लेखनप्रगती मंथन बैठक पहिली : निवड झालेल्या उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी पहिली बैठक १० मार्च, २०२६ ते १२ मार्च, २०२६ या कालावधीत असेल.
- लेखनप्रगती मंथन बैठक दुसरी : उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी दुसरी बैठक १० जुलै, २०२६ ते १२ जुलै, २०२६ या कालावधीत असेल. अंतिम सुपुर्दता (सबमिशन) : बारा उमेदवारांनी वर्षभर केलेले लेखन १० नोव्हेंबर, २०२६ रोजी ते संस्थेकडे सुपुर्द करतील. त्याचे परीक्षण करून, दिनांक १४ डिसेंबर, २०२६ रोजी वर्षभरातील बारा उमेदवारांच्या लेखनाविषयीची माहिती सर्वांसमोर मांडण्यात येईल. तसेच, पुढील वर्षाच्या फेलोशिपसाठी (२०२६) अंतिम निवड झालेल्या बारा उमेदवारांच्या नावाची घोषणाही या दिवशी होईल.
- प्रकाशन योजना : फेलोशिप अंतर्गत लेखकाने तयार केलेल्या लेखनाचा अंतिम मसुदा तज्ज्ञ निवड समितीने स्वीकृत केल्यानंतर तो पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सहकार्य करेल. यात (लेखकाच्या सहमतीने) प्रकाशन संस्थेची निवड आणि प्रकाशनासाठी/अनुवादाचे हक्काचे घेण्यासाठी रुपये २५ हजार आर्थिक सहकार्य यांचा समावेश असेल.
क) फेलोशिपसाठी निवड :
- आलेल्या अर्जांचे आणि मजकुरांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास त्यांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः युवक आणि युवती अशा एकूण १२ युवक-युवतींची
- निवड तटस्थपणे करण्यात येईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हाच एकमेव निकष असेल.
- निवड झालेल्या प्रत्येक लेखकाला लेखनाचे कौशल्य, तंत्र, संशोधन यांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी गरज असल्यास एक तज्ज्ञ मेंटॉर देण्यात येईल. लेखक आणि निवड समिती यांच्या परस्पर-विचाराने लेखकाला आवश्यकता असेल तर मेंटॉर देण्यात येईल. निवड झालेल्या लेखकाला फेलोशिप कालावधीत प्रत्येकी रुपये ५०,००० मानधन प्रतिष्ठान विहीत करेल व ते चार टप्प्यांत देण्यात येईल. याशिवाय प्रवास, निवास यांसाठी प्रत्येक सत्रासाठी रुपये ५००० याप्रमाणे एकूण चार सत्रांसाठी २०,००० रुपये (सत्र १ अभिमुखता; सत्र २ लेखनप्रगती मंथनबैठक पहिली; सत्र ३ लेखनप्रगती मंथनबैठक दुसरी; सत्र ४ अंतिम सुपुर्दता) देण्यात येतील. मेंटॉरचे मानधन व प्रवास यासाठी रुपये ३०,००० खर्च करण्यात येतील.
फेलोशिप निवड समिती :
फेलोशिप निवड समितीमध्येमराठी साहित्यक्षेत्रात दीर्घअनुभव असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. निवडलेल्या उमेदवाराच्या प्रगतीचा आढावा या समितीमार्फत वेळोवेळी घेण्यात येईल. सृजनाची प्रक्रिया ही बर्याचदा गुंतागुंतीची असल्याने, आवश्यकेनुसार मेंटॉरचा सल्ला विचारात घेऊन विशिष्ट परिस्थितीत लेखन प्रकल्पाची मुदत वाढवणे किंवा उमेदवाराची प्रगती समाधानकारक नसल्यास मुदत पूर्ण होण्यापूर्वीच फेलोशिप रद्द करणेयाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीला असतील.
- अभिमुखता आणि लेखन आढावा सत्रांमध्ये समकालीन युवा लेखकांशी संवाद साधण्याची संधीही निवड झालेल्या उमेदवारांना लाभणार आहे.
- या फेलोशिप योजनेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्री. नितीन रिंढे हे मुख्य मार्गदर्शक व निवड समितीचे काम पाहतील. या फेलोशिप योजनेसाठी श्री. हेमंत टकले (सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई) हे निमंत्रक असतील. यशवंतराव चव्हाण सेंटरचे रिसोर्स नॉलेज मॅनेजर डॉ. अनिल पाझारे, सेंटरचे मानद कार्यक्रम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ सहकार्य व समन्वय करतील.
प्रसिद्धी आणि प्रचार
ग्रामीण तसेच शहरी भागांतील युवा लेखकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी यासाठी संस्थेच्या वेबसाइट व्यतिरिक्त पुढील माध्यमांतून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे :
अ) वर्तमानपत्रे : सकाळ, पुढारी, लोकमत, लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, नवराष्ट्र या मुख्य वृत्तपत्रांसोबतच त्या-त्या भागांतील स्थानिक वृत्तपत्रांत या योजनेची माहिती प्रसिद्धीस देण्यात यावी.
ब) नियतकालिके/मासिके : साहित्यविषयक नियतकालिके/मासिके - मायमावशी, केल्याने भाषांतर, ललित, मुक्तशब्द, समाज प्रबोधन पत्रिका, चित्रलेखा, महानुभव, शब्दरुची, परिवर्तनाचा वाटसरू, मार्मिक, साधना, लोकप्रभा, राष्ट्रवादी मासिक, निवडक दिवाळी अंक इत्यादी.
क) वेब पोर्टल्स : विविध वेब पोर्टल्स, अक्षरनामा, थिंक महाराष्ट्र इत्यादी.
ड) सोशल मीडिया : फेसबुक आणि व्हॉट्स अपवरील साहित्यविषयक ग्रुप्स.
इ) साहित्यसंस्था : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखा, विदर्भ साहित्य संघ, बृहन्महाराष्ट्र मंडळ.
उ) वैयक्तिक स्तरावर प्रसार : मान्यवर लेखक, ब्लॉगर, संपादक यांना या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याची विनंती करणे.
एकूण १२ युवा लेखक-लेखिकांची निवड तटस्थपणे करण्यात येईल. स्त्री उमेदवारांना समान संधी दिली जाईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हेच निकष कटाक्षाने असतील.
फेलोशिप कालावधी - १४ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२६
१५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी
१५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
१३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती
१ डिसेंबर २०२५
अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा
१ डिसेंबर २०२५
१४ डिसेंबर २०२५
फेलोशिप प्रदान सोहळा
दिनांक १३ डिसेंबर किंवा १४ डिसेंबर २०२५
अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम)
दिनांक १३ डिसेंबर किंवा १४ डिसेंबर २०२५
१० मार्च, २०२६ ते १२ मार्च, २०२६
लेखनप्रगती मंथन बैठक पहिली
१० जुलै, २०२६ ते १२ जुलै, २०२६
लेखनप्रगती मंथन बैठक दुसरी
१० जुलै, २०२६ ते १२ जुलै, २०२६
१० नोव्हेंबर, २०२६
अंतिम सुपुर्दता (सबमिशन)
१४ डिसेंबर, २०२६
परीक्षण
१४ डिसेंबर, २०२६
- श्री. रंगनाथ पठारे
- डॉ. अनिल पाझारे
- श्री. चेतन कोळी
- श्री. रवींद्र झेंडे
- भक्ति जांभवडेकर
- रोहन प्रकाशन
- ग्रंथाली प्रकाशन
- मधुश्री पब्लिकेशन्स
- मंजुल पब्लिशिंग हाउस
- समकालीन प्रकाशन
- शब्दालय प्रकाशन
- साधना प्रकाशन
- साकेत प्रकाशन
- मेहता पब्लिशिंग हाउस
- मनोविकास प्रकाशन
- शब्द पब्लिकेशन्स
- साहित्य प्रसार केंद्र
- लोकवाड्.मय गृह
- पपायरस प्रकाशन
- कृष्णा पब्लिकेशन
- नाग नालंदा
- हरिती प्रकाशन
- मैत्री प्रकाशन
- अनघा प्रकाशन
समकालीन लेखक
- अवधूत डोंगरे
- प्रणव सखदेव
- शर्मिला फडके
- शिल्पा कांबळे
- किरण गुरव
- श्रीरंजन आवटे
- प्राजक्त देशमुख
- मनस्विनी लता रवींद्र
- बालाजी मदन इंगळे
- बालाजी सुतार
- हृषिकेश गुप्ते
फेलोशिप सल्लागार समिती
- प्रा. भालचंद्र नेमाडे
- श्री. रंगनाथ पठारे
- श्री. माधव गाडगीळ
- श्री. महेश एलकुंचवार
- श्रीमती प्रभा गणोरकर
- श्रीमती वीणा गवाणकर
- श्री. वसंत आबाजी डहाके
- श्री. गणेश देवी
- श्री. दिनकर गांगल
- श्री. श्याम मनोहर
- डॉ. बाळ फोंडके