शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन अॅग्रीकल्चर २०२५-२६ बॅचच्या पाच दिवसीय बूटकॅम्पचा बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या 'अटल इन्क्यूबेशन सेंटर'मध्ये उत्साहपूर्ण समारोप झाला. या बूटकॅम्पमध्ये पहिल्या दिवसापासूनच फेलोना एम.के.सी.एल.चे विवेक सावंत, नीलेश नलावडे आणि अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन मिलेट्स, हायड्रोपोनिक्स, अॅरोपोनिक्स आणि अत्याधुनिक मशिन्सच्या कार्यप्रणालीची प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच डेअरी प्रोसेसिंग युनिटच्या भेटीतून दुग्धव्यवसायातील तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन बारकावे समजून घेतले.

या पाच दिवसांच्या सत्रात फेलोनी केवळ तांत्रिक ज्ञानच नाही, तर उद्योजकतेसाठी आवश्यक असणारी कौशल्येही आत्मसात केली. यामध्ये 'डिझाइन थिंकिंग', 'बिझनेस पिच डेक' तयार करणे, 'स्टोरीटेलिंग' आणि स्टार्टअपसाठी आवश्यक कायदेशीर बाबींचा सखोल अभ्यास करण्यात आला. तसेच आयपी (IP) अवेयरनेस प्रोग्रामद्वारे पेटंट आणि ट्रेडमार्कचे महत्त्व जाणून घेतले. संतोष पिसे यांच्या सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंगने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला, तर समीर डोमबे आणि मयुर पवार यांच्या यशोगाथांनी त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी प्रेरित केले.

बूटकॅम्पचा समारोप हवामान पूरक शेती (Climate Smart Agriculture) आणि सांस्कृतिक संध्याकाळने झाला, ज्यामुळे शिकण्यासोबतच फेलोमध्ये एकतेची भावना निर्माण झाली. हा बूटकॅम्प म्हणजे केवळ प्रशिक्षण नसून कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला आहे. शाश्वत शेती आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सच्या माध्यमातून हे फेलो आता कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत.