शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ बाल शिक्षण ]

शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. एकविसाव्या शतकातील एकविसाव्या वर्षापासून शालेय शिक्षणाच्या मुलभूत पुनर्रचनेची या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.
कारण विशेषत: गेल्या वर्षीपासून दैनंदिन जीवनाचे संदर्भ पार बदलून टाकणाऱ्या अनेक वेगवान महाप्रवाहांचा प्रभाव एकाच वेळी जगभर वाढू लागला आहे.
बदल घडवून आणणारे शेती, औद्योगिक क्रांती, इ. महाप्रवाह इतिहासात पूर्वीही येऊन गेले आहेत. परंतु त्यांचे जगभर परिणाम दिसायला शतके लागली. विद्युत उर्जेच्या महाप्रवाहाने जगाला कवेत घ्यायला, पृथ्वीवर ‘इलेक्ट्रिकल सिव्हिलायझेशन’ साकारायला शतक लागले. संगणन व माहिती तंत्रज्ञानाच्या महाप्रवाहाने जगावर अधिराज्य प्रस्थापित करायला अर्धशतक लागले. आताचे बदल घडविणारे महाप्रवाह मात्र कमालीचे वेगवान आहेत. त्यांचे परिणाम अनुभवास यायला आता पाच-दहा वर्षेही लागत नाहीत. त्यांच्या प्रचंड वेगापुढे मानवी समाजाची दमछाक होताना आपण पाहतो आहोत.
वेग, अधिक वेग आणि प्रचंड वेग हेच त्या महाप्रवाहांचे आणि त्यांनी प्रभावित केलेल्या मानवी जीवनाचे आता व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. यातले काही महाप्रवाह अनिष्ट आहेत तर काही इष्ट. उदाहरणार्थ एकीकडे अनिष्ट हवामान बदल तर दुसरीकडे इष्ट ज्ञानक्रांती. हे महाप्रवाह दीर्घ काळ टिकून राहतील व वेगाने वाढत जातील अशी चिन्हे आहेत. या महाप्रवाहांमुळे मानव जातीपुढे व विशेषत: विद्यर्थ्यांपुढे जशी अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत तशाच नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत.
अशा अनेक महाप्रवाहांचा, आव्हानांचा आणि संधींचा अनुभवजन्य परिचय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. तसे केल्यासच त्यांचे शिक्षण जीवनाभिमुख, भविष्यवेधी व म्हणूनच अर्थपूर्ण होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि देशाचे भवितव्य केवळ सुरक्षितच नव्हे तर उज्ज्वलही होऊ शकेल. पण तसे न केल्यास आपण त्यांना भूतकाळासाठी तयार करू!
हे महाप्रवाह, आव्हाने व संधींच्या संदर्भातील “नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये काय असायला हवीत व अशा उद्दिष्टांच्या परिपूर्तीसाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत केवळ सुधारणा (रिफॉर्म) करून चालणार नाही तर त्यात विचारपूर्वक परिवर्तन (ट्रान्सफॉर्म) घडवून आणावे लागेल. प्रचलित व्यवस्था काहीशी बंदिस्त व साचेबंद आहे. त्यामुळे त्यातील ठराविक अभ्यासक्रम व त्याच्या ठराविक पद्धतीच्या अध्यापन, अध्ययन व मूल्यमापनातून शिक्षणाचे परिवर्तन घडवून आणण्याला मर्यादा आहेत. त्या व्यवस्थेतून नवे महाप्रवाह, नवी आव्हाने व नव्या संधी यांच्या संदर्भात होऊ शकणाऱ्या विद्यार्थी विकासालाही मर्यादा आहेत.
नवशिक्षणाची नवी उद्दिष्ट्ये कितीही अवघड असली तरीही तशा परिवर्तनासाठी शिक्षक या त्यातल्या त्यात अधिक प्रभावी घटकापासून सुरुवात करता येईल. जिद्दीने प्रयत्न करू शकणाऱ्या शिक्षकांना हुडकून काढून प्रशिक्षण व प्रोत्साहन द्यावे लागेल. प्रचलित शिक्षण व्यवस्थेत विषयनिहाय अपेक्षित असलेली पाठ्यपुस्तकांमधील किमान उद्दिष्ट्ये वरील आव्हाने व संधींचा परिचय होण्यासाठी आधारभूत आहेत. पण पुरेशी मात्र नाहीत. ती किमान उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी योग्य ते अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन हे प्रत्येक शिक्षकाने उत्कृष्ट गुणवत्तेने केलेच पाहिजे. व्यवस्थेची व समाजाची ती किमान अपेक्षा आहेच. पण नव्या परिवर्तनासाठी त्या पलिकडे जावे लागेल. केवळ ‘विषयांचे शिक्षक’ हे साध्य करू शकणार नाहीत. त्यासाठी हवेत ‘विद्यार्थ्यांचे शिक्षक’.
त्यामुळे किमान अपेक्षांची उत्तम परिपूर्ती करणाऱ्या पण तेथेच न थांबता त्यापुढे जाऊन आपल्या प्रतिभेने व अतिरिक्त प्रयत्नांनी विशिष्ट शैक्षणिक परिवर्तन घडवून आणू शकणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे उचित होईल. ती परिवर्तनाची उचित सुरुवात ठरेल. अशा शिक्षकांनी हे महाप्रवाह, त्यातील आव्हाने व संधी यांचा निरंतर अभ्यास करून अध्यापनात व शालेय उपक्रमात सतत अनुकूल बदल करायला हवेत.
अशा परिवर्तनशील शिक्षणाची अर्थात ‘नवशिक्षणा’ची सुरुवात सध्याच्या शालेय पर्यावरणाशी मेळ राखत, त्यातील सर्व सहभाग-धारकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळवून व विरोध टाळून करावी लागेल. योग्य अशा व नानाविध प्रकारच्या अभ्यासक्रमेतर कृतीशील उपक्रमांमधून, वेळापत्रकेतर वेळात व चाकोरीबाह्य पद्धतीने ती करणे उचित ठरेल. तसे होतकरू व उपक्रमशील शिक्षक या फेलोशिपसाठी पात्र ठरतील. अशा शिक्षकांकरवी परिवर्तनाची सुरुवात करता येईल.
उत्साही, हिकमती, नाउमेद न होता अडचणींचे संधीत रुपांतर करणाऱ्या, विशिष्ट ज्ञान क्षेत्रे, विद्या किंवा कलांमध्ये तरबेज असलेल्या, विद्यार्थ्यांचा विकास करण्यात मनापासून रस असलेल्या, ‘हटके’ प्रवृत्तीच्या शिक्षकांच्या नानाविध उपक्रमांद्वारे हळूहळू हे ‘नवशिक्षण’ मुख्यप्रवाही करण्याचा मार्ग सापडू शकेल. अशा शिक्षकांना आपण ‘बलशाली मार्गशोधक’ किंवा ‘पाथफाइंडर’ किंवा ‘इंस्पायरर फेलोज्’ म्हणूया.
आपल्यला असे शिक्षक शोधून काढावे लागतील. विहित अभ्यासक्रमकेंद्री अध्ययन, अध्यापन व मूल्यमापन या पलिकडे जाऊन सातत्याने परिवर्तनशील कामगिरी केलेल्या शिक्षकांची निवड करावी लागेल. वेळापत्रकापलिकडे जाउन, अभ्यासक्रमापलिकडच्या कल्पक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची जडणघडण करू पाहणाऱ्या व त्यासाठी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या शिक्षकांचा शोध घ्यावा लागेल. त्यांना नवशिक्षणाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वाव, पाठबळ, मदत, प्रोत्साहन, प्रशिक्षण, मार्गदर्शन व प्रतिष्ठा द्यावी लागेल.
त्यांना नवी आव्हाने व संधींशी सुसंगत अशा त्यांच्या पसंतीच्या व प्राविण्याच्या उपक्रमांच्या आरेखन व अंमलबजावणीसाठी रोख रक्कम व सातत्यपूर्ण मार्गदर्शन या स्वरूपातील शिष्यवृत्ती / प्रकल्प-वृत्ती देण्यात येईल. त्या प्रकल्प-वृत्तीस “माननीय श्री. शरद पवार इन्स्पायर फेलोशीप” असे संबोधण्यात येईल.
शिक्षण उद्यासाठी असते. उद्याचे सुजाण, सतर्क, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खऱ्या, उचित व उत्तम शिक्षणाकडून अपेक्षित असते. शिकावे कसे, शिकण्याचा आनंद कसा घ्यावा-द्यावा आणि आजन्म शिकत कसे राहावे हे शिकविते ते खरे शिक्षण. शिकता-शिकता जे उद्याची आव्हाने पेलायला सज्ज करते, उद्याच्या संधींचे सोने करायला शिकवते ते खरे शिक्षण. शिक्षणक्षेत्रात नवीन प्रयोग, संशोधन करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांना संशोधनाची संधी मिळावी, नव्या कल्पनांना वाव मिळावा आणि प्रयोगांना चालना मिळावी, तसेच शैक्षणिक, सामाजिक प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी उमेद मिळावी, या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन देण्यात येते. ही फेलोशिप २० प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षकांना दिली जाते. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या संशोधनात्मक कामाला चालना देणे, हे मुख्य उद्दिष्ट या फेलोशिपचे आहे आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये अनेक शिफारशी केल्या आहेत आणि कार्यक्रमही सुचवले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेला कृती कार्यक्रम (SARTHAQ भाग १ आणि २), तसेच निपुण भारत अभियान. तसेच भारतीय संविधानाच्या तरतुदींच्या अनुषंगाने मूल्यशिक्षण, स्वयंअध्ययन आणि सहअध्ययन यांचा अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन प्रक्रियेत प्रभावी वापर, विविध विषयांचा परस्परांशी आणि कला व खेळ यांच्याशी समन्वय, बहुवर्ग अध्यापन, वाचताना वाचनाचा वेग आणि आकलन वाढवण्यासाठी घेतलेले उपक्रम, पालक आणि स्थानिक समाज यांचा शालेय कामकाजात आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सहभाग, शाळेची इमारत आणि परिसर यांचा शैक्षणिक साधन म्हणून वापर, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर, असे अनेक उपक्रम आयोजित करता येतील. ही केवळ उदाहरणे म्हणून दिली आहेत, परंतु आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन, कोणते उपक्रम निवडावे याचे संपूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना असेल.
सध्या महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’ दिली जाते. नवोपक्रम किंवा संशोधन करण्यासाठी काही रोख रक्कम व मार्गदर्शन असे या फेलोशिपचे स्वरूप असते. या फेलोशिपबद्दलची अधिक माहिती आपण पुढील लिंक वर पाहू शकता. शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ बाल शिक्षण ] या वर्षी प्रथमच शालापूर्व स्तरावर बालशिक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी या फेलोशिप मधील १० जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शालापूर्व स्तरावर कृती संशोधनाला प्रोत्साहन मिळावे असा हेतू या निर्णयामागे आहे.
या अंतर्गत अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, CDPO, अनुदानित शाळांतील बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते हे फेलोशिपसाठी पात्र असतील. त्यांना बालशिक्षण क्षेत्रात कृती संशोधन करण्याची संधी दिली जाईल.
बालवयातील शिक्षणाचे महत्त्व
बाल्यावस्था—विशेषतः जन्म ते ६ वयोगट—हा मेंदूच्या झपाट्याने होणाऱ्या विकासाचा कालखंड असतो. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मानवी मेंदूचा सुमारे ९०% विकास पूर्ण होतो. या वयात मिळणारे अनुभव, शैक्षणिक वातावरण, खेळ, अन्वेषण आणि कृतीच्या संधी मुलांच्या एकूण शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासावर खोल परिणाम करत असतात.
भारतातील बालशिक्षणाचा प्रवास
गिजुभाई बधेका यांनी बालशिक्षणाच्या कामाला स्वातंत्र्यपूर्व काळात सुरूवात केली व ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी हे काम पुढे नेले. महाराष्ट्रात ताराबाई व अनुताई यांनी बालशिक्षणातील भरीव कामाची पायाभरणी केली. १९७५ मध्ये सुरू झालेल्या ICDS (Integrated Child Development Scheme) अंतर्गत अंगणवाड्यांद्वारे बालशिक्षणाच्या सेवा दिल्या जाऊ लागल्या. मात्र, ICDS मधील इतर आरोग्य व पोषण सेवांबरोबर शिक्षण ही एक सेवाच ठरली. त्यामुळे शिक्षणाला अपेक्षित प्राधान्य मिळाले नाही. महाराष्ट्रात ‘आकार’ अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अंगणवाड्यांतील शिक्षणासाठी एक चौकट निर्माण करण्यात आली. त्यामुळे अनेक अंगणवाड्यांमध्ये बालशिक्षणाचे अधिक चांगले काम होऊ लागले आणि सेविकांना विशेष प्रशिक्षणही मिळाले. तरीही, बालशिक्षण औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या कक्षेबाहेरच राहिले.
शैक्षणिक धोरणानुसार बदल
२०२० साली जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP 2020) बालशिक्षणाला प्रथमच औपचारिक शिक्षणव्यवस्थेचा भाग म्हणून मान्यता दिली आहे. वय वर्षे ३ ते ८ या काळाला शिक्षणातील Foundational Stage म्हणण्यात आले आहे, त्यासाठी विशेष अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अंगणवाड्या, बालवाड्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून प्राथमिक शाळांशी जोडल्या आहेत.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील अंगणवाडी व इतर संस्थांमध्ये बालशिक्षणाच्या संदर्भात संशोधन व कृती अभ्यास होणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना गुणवत्तेनुसार देत आहोत. बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना SPIF in Education देण्यात येईल, यामुळे अंगणवाडी सेविकांना प्रेरणा मिळून त्यांचे सक्षमिकरण होईल, याचा विश्वास वाटतो. त्यामुळे या वर्षीपासून शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमध्ये बालशिक्षण क्षेत्रासाठी १० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
बालशिक्षणामध्ये कृतीसंशोधनाची अनोखी संधी: NEP 2020 च्या अंमलबजावणीतील दरी शोधणे
बालशिक्षण (Early Childhood Education - ECE) क्षेत्रात कृतीसंशोधन (Action Research) करण्याची ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाची संधी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) मध्ये प्रथमच बालशिक्षणाचे महत्त्व शासकीय स्तरावर सखोल आणि विस्तृतपणे अधोरेखित करण्यात आले आहे. या धोरणाने बालवयातील शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणले असून, या टप्प्यावर काम करणाऱ्या सर्वांसाठी हे एक मोठे आणि आशादायक पाऊल आहे.
NEP 2020 आणि बालशिक्षणाचे महत्त्व
NEP 2020 ने बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या शिक्षणाला पायाभूत स्तरावर (Foundational Stage) विशेष महत्त्व दिले आहे. यात लहान मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला गेला आहे, ज्यात शारीरिक, भावनिक, सामाजिक, संज्ञानात्मक आणि भाषिक विकासाचा समावेश आहे. या धोरणाने केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमाची नव्हे, तर मुलांच्या खेळातून शिकण्याची प्रक्रिया, शिक्षकांचे प्रशिक्षण, पोषक वातावरण आणि पालकांचा सहभाग या सर्व पैलूंना महत्त्व दिले आहे.
कृतीसंशोधनाची आवश्यकता: धोरण आणि वास्तव यातील दरी
या महत्त्वाच्या धोरणाची अंमलबजावणी करत असताना आपल्याला एक मोठी जबाबदारी पेलावी लागणार आहे: ती म्हणजे धोरणात नमूद केलेल्या अपेक्षा (Policy Demands) आणि प्रत्यक्षात काय घडत आहे किंवा घडत नाही (Current Reality) यातील दरी (Gaps) शोधणे. हेच आपल्या कृतीसंशोधनाचे मुख्य केंद्रबिंदू असणार आहे.
उदाहरणार्थ
१. धोरणातील तरतूद: NEP 2020 बालवाडी शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षणावर भर देते.
• शोधण्याची दरी: प्रत्यक्षात किती शिक्षकांना पुरेसे प्रशिक्षण मिळत आहे? प्रशिक्षणाचा दर्जा कसा आहे आणि ते प्रशिक्षक प्रत्यक्ष वर्गात त्या ज्ञानाचा उपयोग करत आहेत का?
२. धोरणातील तरतूद: खेळातून शिकणे (Play-based learning) आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतींचा वापर.
• शोधण्याची दरी: खरंच किती शाळा किंवा अंगणवाड्यांमध्ये या पद्धतींचा अवलंब केला जात आहे? यासाठी आवश्यक साधने आणि संसाधने उपलब्ध आहेत का? शिक्षक पारंपरिक पद्धती सोडून नवीन पद्धती स्वीकारण्यास तयार आहेत का?
३. धोरणातील तरतूद: पालकांचा सहभाग आणि समाज-आधारित दृष्टिकोन.
• शोधण्याची दरी: पालक बालशिक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत का? त्यांचे सहभागाचे प्रमाण किती आहे आणि कोणत्या स्तरावर आहे?
या दरी शोधण्यामुळे आपल्याला नेमके कुठे काम करण्याची गरज आहे, कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत आणि कोणत्या अडचणी दूर करायच्या आहेत, हे स्पष्ट होईल. हे केवळ धोरणातील त्रुटी शोधण्यापुरते मर्यादित नसून, धोरणाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आणि बालकांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
फेलोशिपचा प्रकल्प हायपर लोकल म्हणजे त्यांच्या स्थानिक कामात संशोधन करणारा असू शकेल.
वर्गांतर्गत कामाच्या पुढे जाऊन शिक्षण प्रशिक्षण, शासनाबरोबरील काम यावरही काम करता येईल.
वेबसाईटवर दिलेले विषय हे सूचक असतील. अर्जदारांनी त्यातील विषय निवडले तरी चालतील किंवा त्या व्यतिरिक्त स्वत:चे विषय निवडले तरी चालतील.

नमुना विषय :
शाळा
मुले
- कोणत्या वर्तन समस्या दिसतात? त्या कशा सोडवाव्यात?
- वेगळी मातृभाषा असणारी मुले वर्गात कशी जमवून घेतात?
वर्गातील प्रक्रिया
- बालकांच्या सर्वांगीण विकासाला वाव देणाऱ्या वर्गातील प्रक्रिया
- गणन पूरक संकल्पनांसाठी गणिती भाषेचा विकास
मुल्यमापन निरीक्षण
- निरीक्षण करून बालशाळेच्या मुलांचे मुल्यमापन करणे
- पोर्टफोलीओच्या माध्यमातून मूल्यमापन
साहित्य
- शैक्षणीक साहित्याची उपयुक्तता तपासणे
- मुक्तखेळाच्या माध्यमातून मुले काय आणि कसे शिकतात?
वातावरण
भौतिक वातावरण
- बालशाळेतील अध्ययन कोपऱ्यांचा वापर
- Displays चा वापर
सामाजिक वातावरण
- नियम आणि स्वयंशिस्त यांचा अभ्यास
- दिनचर्या
पालक/समाज
- पालक सभेच्या माध्यमातून पालकाचा सहभाग वाढवणे.
- परिसरातील उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधून पोषक आहार निर्मीती कशी करावी?
- बालवाडीतील मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शिकवण्यांचा अभ्यास.
व्यवस्था
- Online प्रशिक्षण किती प्रभावी?
- शाळा भेटीदरम्यान बालशिक्षणाला कशी मदत करता येईल?
फेलोशिपसाठी वयोमर्यादा: | वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अंगणवाडी, बालवाडी सेविका पर्यवेक्षिका, CDPO, बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते |
फेलोशिप कालावधी: | सप्टेंबर २०२५ ते मे २०२६ |
फेलोशिपसाठी पात्रता बालशिक्षणामध्ये : |
महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी लोक, Under privileged समुदायासाठी काम करणाऱ्या लोकांना ही फेलोशिप देण्यात येईल.
खाजगी अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्यांना ही फेलोशिप देता येणार नाही |
फेलोशिप्सची संख्या: | प्रती वर्षी १० |
अर्जदारांचे कार्यक्षेत्र | महाराष्ट्रातील अंगणवाडी, बालवाडी आणि बालशिक्षणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था |
फेलोशिपची रक्कम: | निवड झालेल्या प्रत्येक अर्जदारास वार्षिक रु. ६०,००० /- (रुपये साठ हजार फक्त). यापैकी रुपये ४०,०००/- फेलोशिपमधील उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास, इ. साठी लागणारा खर्च सदर रक्कमेतून करावयाचा आहे. रुपये २०,०००/- हे कार्यशाळा आणि मेंटरिंग साठी खर्च केले जातील. |
१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे कृतीसंशोधन प्रकल्प करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.
२) आपण जो कृतीसंशोधन प्रकल्प हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.
३) आपण करीत असलेला कृतीसंशोधन प्रकल्प इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.
४ ) आपण घेतलेला कृतीसंशोधन प्रकल्प कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.
५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी घ्यावी.
६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला कृतीसंशोधन प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे. कृतीसंशोधन प्रकल्पास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.
७ ) आपला कृतीसंशोधन प्रकल्प चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.
८) आपण केलेल्या कृतीसंशोधन प्रकल्पाचे सादरीकरण पोस्टरच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.
९) कृतीसंशोधन प्रकल्प अंतिम अहवाल सादर करताना आपल्या वरिष्ठांचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
१. |
इच्छुक शिक्षकांनी दिनांक १५ ऑगस्ट २०२५ अखेर https://apply.sharadpawarfellowship.com या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. |
२. |
अर्ज करताना भरावयाची माहिती नाव :मोबाईल नंबर :ई-मेल (असल्यास) :जन्मतारीख:पत्ता:जिल्हा :शैक्षणिक पात्रता:
पद :
कामाचे ठिकाण :
या फेलोशिप दरम्यान करण्याच्या कामासाठी आवश्यक वेळ देण्याची तुमची तयारी आहे का? (८ तास प्रति आठवडा)
या फेलोशिप दरम्यान कार्यशाळांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. यासाठी वेळ देण्याची व प्रवास करण्याची तुमची तयारी आहे का?(सप्टेंबर २५ ते एप्रिल २६ या कालावधीत एकूण ४ कार्यशाळा मिळून १० दिवस. तपशीलासाठी टाइमलाईन बघा)
तुम्ही फेलोशिपमध्ये करायच्या अभ्यासाचा कोणता विषय निवडला आहे त्याबद्दल थोडक्यात लिहा. (७५ ते १०० शब्द) *तुम्ही निवडलेला विषय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांतर्गत येतो ते निवडा.
तुम्ही हा विषय का निवडला आहे याबद्दल थोडक्यात लिहा. (१०० ते १५० शब्द)*सूचना: ही माहिती येथे फक्त बघायला म्हणून दिलेली आहे. तुम्हाला Apply Now वर जाऊन अर्ज करणे अनिवार्य आहे. |
अर्ज प्रक्रिया
इच्छुकांनी Apply Now या बटनावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.
निवड प्रक्रिया
तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल व पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच अर्जदारांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष / दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीतील गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी वरील प्रमाणे १० जणांची निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या फेलोची, फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यांच्या वरिष्ठांची सहसंमती घेण्यात येईल.
१५ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची अंतिम मुदत
१५ ऑगस्ट २०२५
१६ ते ३० ऑगस्ट २०२५
अर्जाची छाननी आणि निवड प्रक्रिया
५ सप्टेंबर २०२५
निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे
५ सप्टेंबर २०२५
८ सप्टेंबर २०२५
निवड झालेल्या फेलोंची ऑनलाईन बैठक
१९, २०, २१ सप्टेंबर २०२५ (बारामती)
प्रथम कार्यशाळा
१९, २०, २१ सप्टेंबर २०२५ (बारामती)
१, २ नोव्हेंबर २०२५ (खंडाळा)
द्वितीय कार्यशाळा
१४ डिसेंबर २०२५ (यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई)
फेलोशिप प्रदान सोहळा
१४ डिसेंबर २०२५ (यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई)
७, ८ फेब्रुवारी २०२६ (पुणे)
तृतीय कार्यशाळा
४, ५, ६ एप्रिल २०२६ (नाशिक) जोडून सिन्नर प्रकल्पाला भेट
कामाचे प्रदर्शन
४, ५, ६ एप्रिल २०२६ (नाशिक) जोडून सिन्नर प्रकल्पाला भेट
- बालशिक्षण – व्याख्या, इतिहास व महत्त्व
- फेलोशिपचे स्वरूप व साधारण वेळापत्रक
- अर्ज व निवडीबाबत तपशील
- FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
योगेश कुदळे
शिक्षण विभाग प्रमुख
यशवंतराव चव्हाण सेंटर,
जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१
ई-मेल आयडी : education@chavancentre.org
फोन नं : +91 93707 99791
शैलेश जाधव
फोन नं : +919503060698