शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप (२०२४-२५) अंतर्गत आयोजित दोन दिवसीय 'लेखन कार्यशाळा' वाशी येथील राजस्थान भवन येथे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. नितीन रिंढे, दत्ता बाळसराफ, गणेश विसपुते, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. करुणा गोखले, राजीव नाईक, डॉ. मुकुंद कुळे, किरण येले, डॉ. अनिल पझारे आणि रवींद्र झेंडे यांसारख्या दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेचा प्रारंभ साहित्य निर्मितीच्या प्रेरणा आणि समकालीन लेखनावर आधारित चर्चेने झाला. यावेळी डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी नमूद केले की, प्रत्येक काळ हा विशिष्ट लेखन प्रकाराने प्रभावित असतो, परंतु सद्यस्थितीत वाचक अधिक चोखंदळ झाला असून तो विविध प्रकारचे साहित्य आवडीने वाचत आहे. त्यामुळे नवोदित लेखकांनी कोणत्याही एका साच्यात न अडकता विविध साहित्यप्रकार हाताळावेत, अशी मोलाची सूचना त्यांनी केली.
कार्यशाळेच्या पुढील सत्रात साहित्याच्या प्रेरणा, लेखनाचे नियोजन, लेखनाचा हेतू आणि त्याची गरज यांवर सर्व मार्गदर्शकांनी सविस्तर चर्चा केली. दुसऱ्या सत्रात सहभागी नवोदित लेखकांनी आपल्या साहित्याचे सादरीकरण केले आणि लेखन करताना येणाऱ्या अडचणींवर तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी लेखनाची शैली, व्यासंग वाढवण्यासाठी आवश्यक असलेले वाचन, प्रासंगिक उदाहरणांचा वापर आणि मराठीव्यतिरिक्त इतर भाषांतील साहित्याचा अभ्यास यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात लेखकांनी आपापल्या साहित्यप्रकारानुसार गटाने आणि स्वतंत्रपणे मार्गदर्शकांशी चर्चा करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष साहित्यावर सखोल अभिप्राय मिळवले. अंतिम सत्रात सर्व मार्गदर्शकांनी शरद पवार साहित्य फेलोशिपची भूमिका स्पष्ट करत लेखकांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. या फेलोशिपच्या माध्यमातून सकस आणि दर्जेदार साहित्य लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोहोचावे, अशी इच्छा प्रा. नितीन रिंढे, दत्ता बाळसराफ आणि डॉ. अनिल पझारे यांनी व्यक्त केली. सर्व मान्यवर मार्गदर्शकांनी सहभागी लेखकांच्या पुढील साहित्यिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि ही कार्यशाळा नवोदित लेखकांसाठी एक नवी दिशा देणारी ठरली.